पारस... नाम ही काफी है....Paras... naam hi kafi hai....

 

Paras... Naam Hi Kafi Hai...

पिपरी धानोरा चंद्रपूर तालुक्यातील छोटेसे गाव. गाव तसं धनसंपन्न. गावातील अनेकांचा व्यवसाय शेती. मात्र, प्रगतीची शिखरे गाठणे त्यांच्या रक्तात. त्यामुळे शेतीसोबत अनेकांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. चंद्रपूर जिल्हास्थानी असलेल्या अनेकांनी गाव बघितले नसले, तरी त्यांच्या मनावर गावाचे नाव निश्चितपणे कोरले आहे. सुमन आणि मनोहर पिंपळकर यांच्या संसारवेलीवर पारस नावाचे फुल उमलले. मुलाने शिकून मोठे व्हावे. घरात हातभार लावावा, अशी प्रत्येक आई-वडिलांप्रमाणे त्यांचीही ईच्छा होती. परंतु, बालपणापासूनच नेतृत्त्वाचे गुण पारसमध्ये होते. त्याला कारणही आहे. त्याची आई ग्रामपंचायतची सदस्य होती. बाबांनी पंचायत समितीची निवडणूक लढविली. त्यामुळे पारसने समाजात शिक्षित संबोधले जाईल, एवढे शिक्षण घेतले. मात्र, त्याचे मन शिक्षणात रमत नव्हते. समाजासाठी काही तरी देण लागतो, या भावनेतून समाजकार्य करण्याकडे त्याची ओढ होती. जिल्ह्यात विकासपुरुष अशी प्रतिमा निर्माण करणारे आणि जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात त्याने ऑफिसबाय म्हणून नोकरी पत्करली. पैसे कमावणे हा त्याचा मुळीच उद्देश नव्हता. केवळ मोठ्या कर्तुत्ववान व्यक्तींच्या सानिध्यात राहून काही शिकता येईल, हेच त्याचे ध्येय होते. तब्बल १३ वर्षे सुधीरभाऊंच्या कार्यालयात त्यांनी काम केले. या काळात त्याने गावखेड्यातून येणारे पुढारी, सुधीरभाऊंचा जनसंपर्क, जनतेची सेवा करण्याचे वेगवेगळे उपक्रम आदी बाबी जवळून बघितल्या. सुधीरभाऊंच्या अनेक यशात पारसचा (प्रेसनोट वितरण) काही प्रमाणात का असे ना निश्चितपणा वाटा होता, हे नाकारता येत नाही. यानंतर या पट्ट्याने गावची ग्रामपंचायत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. सुधीरभाऊंच्या तालमीत वाढलेला हा पट्टा गावात बाजी मारणार हे निश्चित होते आणि झालेही तसेच. पहिल्याच प्रयत्नात अवघ्या २१ व्या वर्षी तो ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आला. गावापुढे शहाणपण चालत नाही. या उक्तीप्रमाणे त्याने गावातील पुढाऱ्यांसोबत जुळवून घेतले. पाच वर्षे सोबतीने घालविले. त्यांचे बारकावे शिकले. त्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये पुन्हा निवडणूक लढली आणि विजयी झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याची गावाप्रती तळमळ बघून उपसरपंचपदावर नियुक्ती केली. पाच वर्षे त्याने केवळ गावाचा विकास व्हावा, हाच उद्देश ठेवून काम केले. कधी नव्हे, तेवढी कामे गावात होऊ लागली. गावकऱ्यांमध्ये पारस या नावाविषयीची आपुलकी पुन्हा वाढू लागली. पुढील दोन वर्षांनंतर तत्कालिन सरपंचावर अविश्वास आणण्यात आला. अविश्वास बहुमताने पारितही झाला. आता पुढे काय, असा प्रश्न सर्वांसमोर पडला. परंतु, सर्वांच्या तोंडात एकच उत्तर आले आणि ते म्हणजे पारस सरपंच होणार... गावकऱ्यांनी ठरविले आणि अवघ्या २५ व्या वर्षी तो गावचा सरपंच झाला. यानंतर तब्बल आठ वर्षे या पदावर त्याने काम केले. सुधीरभाऊंसोबत काम करीत असताना अन्य गावखेड्यातील पुढाऱ्यांशी झालेली ओळख आता त्याला कामात येऊ लागली. घुग्घुसचे सरपंच देवराव भोंगळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. यानंतर पारसने त्यांच्या ओळखीचा फायदा घेत गावाचा विकास कसा असतो, हे अनेक कामांतून दाखवून दिले. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पारसला शेतकऱ्यांची व्यथा माहित होती. सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. परंतु, त्याचा किती जण फायदा घेतात, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे त्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक होऊन शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, हा त्याचा एकमेव उद्देश होता. ग्रामपंचायत गटातून त्याने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. परंतु, निवडणूक म्हटली की उमेदवारीसाठी होणारी रस्सीखेच त्याच्यासंदर्भातही झाली. देवराव भोंगळे यांनी पारसला जवळून बघितले आहे. त्यांनी जोर लावला आणि उमेदवारी मिळाली. यानंतर या पट्ट्याने परिसरातील अनेक गावांतील सरपंच, उपसरपंच, सदस्यांच्या भेटीगाठी घेतल्या. पारसवर अनेकांनी विश्वास ठेवला आणि निवडणुकीत पारस सर्वाधिक मताने विजयी झाला. यात त्याला भाजपसोबतच अन्य पक्षातील मित्रांचे मोठे सहकार्य लाभले. ज्यांच्या कार्यालयात चपराशी कम ऑफिसबाय म्हणून नोकरी करणाऱ्या सुधीरभाऊंच्या हस्ते सत्कार होणे, हे त्याच्यासाठी खूप मोलाची बाब होती. लहान असो वा मोठा सर्वांसोबत भाऊ म्हणून बोलणारा पारस. आजघडीला गाव आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतो, याचा निश्चितच अभिमान वाटतो. याला कारण म्हणजे सर्वांना आपलेसे करून घेण्याची त्याची नावाप्रमाणे असलेली वृत्ती आजघडीला त्याच्या यशात मददगार ठरली. आज पारसचा वाढदिवस. पारसला खूप खूप शुभेच्छा... पारस तुला दीर्घायुष्य लाभो आणि तुझ्या हातून ग्रामीण जनता, शेतकरी यांच्या हिताचे कार्य अविरत घडो, एवढीच या जन्मदिनी अपेक्षा....


- साईनाथ सोनटक्के,

चंद्रपूर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या